Tuesday, October 19, 2010

रद्दी !


मान्यवर लेखकांची पुस्तकं अशी रद्दीत पडल्याचं पाहूनखूप वाईट वाटलं. वापरुन वापरुन जुनी झालेली ती रद्दी हा अर्थ आता पुस्तकांच्या बाबतीत तरी बदलत चाललाय. हे खरंय. पण नव्या पुस्तकांनाच रद्दीचा रस्ता दाखविला गेल्याचं प्रमाणही गेल्या काही वर्षात वाढल्याचं माझ्या शोधक अनुभवानं टिपलं आहे. काहीही असो पण हे रद्दीवाले या वाट चुकलेल्या पुस्तकांना पुन्हा नव्या प्रवाहात आणण्याचं काम करताहेत एवढं मात्र नक्की.

कुठल्याशा एका अडगळीत रचून ठेवलेला, थोडीफार जळमटं लागायला सुरुवात झालेला हा प्रत्येकाच्याच घरातला एक ‘विकाऊ’ भाग म्हणजे रद्दी.रोजच्या रोज घरी पेपर येतो. तो नेहमीप्रमाणे शिळाही होतो. एवढं एकच कारण या रद्दी होण्याला. माझ्या घरात मात्र ही रद्दी चार ठिकाणी विखुरली आहे. एक एकदम फ्रेश रद्दी. रोज नव्या जुन्या ‘वर्तमानाचा’ इथं रतीब ठरलेला !
दुसरी यातूनच काही नंतर वाचूयात या बोलीवर वेगळी काढून ठेवलेली रद्दी !
तिसरी म्हणजे कधी तरी सगळाच(अर्थात रद्दीचा) पसारा वेळ मिळाला की घेऊन बसायचा आणि ज्या पानांचा आपला कधी संबंध येत नाही(व्हीवा, सप्तरंग, मुक्तपीठ, गंधर्व, आरोग्य जागर वगैरे...) अशी पानं काढून विकण्यासाठी सज्ज ठेवलेला विकाऊ माल.खरं म्हणजे संग्रहित करुन ठेवलेल्या कात्रणांना रद्दी म्हणण्या इतकंच मोल कधी कधी उरतं. नंतर वाचूया हे स्वत:लाच स्वत: दिलेलं वचन पाळता आलं नाही की, स्वत:वरच रागवल्यासारखं होतं. पण कात्रणांचा ढीग लावण्याचं काही कमी होत नाही, आणि रद्दीचं साचवणं सुरु राहतं. खरं म्हणजे रद्दीचं आणि माझं नात अजोड असल्यासारखं आहे.
एकदा लहान असताना रद्दी विकायला गेलो होतो. तेव्हा त्या दुकानात शंकर पाटलांचं घालमेल पुस्तक रद्दीच्या रगाड्यात दिसलं. तेव्हा शंकर पाटील कोण हे ठाऊक असण्याचा काही संबंधही नव्हता. पण पुस्तक बरं दिसलं म्हणून सहज विचारलं तर तोच रद्दीवाला(पुस्तकवाला) तेच पुस्तक फक्त तीन रुपयाला द्यायला तयार झाला, आणि रद्दीतून पुस्तकं घेण्याचं अक्षरक्ष: वेड लागलं. उगाचच रद्दीच्या दुकानात जाऊन पुस्तकं धुंडाळायची. खिशात पैसे नसले तरी त्याच्या उगाचाच किमती विचारायच्या. असले की, पहिल्यांदा चार दोन रद्दीची दुकानांना भेट द्यायची अशा प्रवासात खूप ‘वैभव’ माझ्या हाती लागलं. यात भल्या भल्या लेखकांची पुस्तकं हाताला लागली. त्यामुळं रद्दीचं दुकान हे माझ्यासाठी पुस्तकांचं दुकान असल्यासारखं झालं.
सुरुवातीला केवळ पुस्तकं आपल्याजवळ असावी या भावनेनं संग्रह करत गेलो. शाळेत असताना अरुणा ढेरेंचं व्याख्यान स्नेहसंमेलनात ऐकलं होतं त्यात त्या म्हणाल्या होत्या की, माझ्या घरात इतकी पुस्तकं आहेत की त्यातून भिंतही दिसत नाही. म्हणजे सगळ्या भिंतीच पुस्तकांच्या असल्यासारख्या.या वाक्याने तेव्हा मनात कुठंतरी घर केलं होतं, उगाचच वाटायचं या रद्दीच्या दुकानांतून पुस्तकं घेऊन आपल्यालाही पुस्तकांच्या भिंती उभ्या करता येतील.असो.नंतर स्वत: कमवायला लागल्यावरही या रद्दीच्या दुकानांचा नाद काही सुटला नाही. केवळ शोधक नजरेनं जवळपास अडिचशे च्या आसपास मला काही चांगली पुस्तकं जमवता आली. यात गीतारहस्यची पहिली प्रिंट, कुमार केतकरांना रिपोर्टींग स्पर्धेत बक्षीस म्हणून मिळालेलं नेहरुचं आत्मचरीत्र(त्यांनी बहुदा ते नंतर रद्दीत टाकलं), साने गुरुजींच कला म्हणजे काय हे दुर्मीळ पुस्तक, आनंदी गोपाळ यांचं चरित्र, अशी एक ना अनेक पुस्तकं मला गवसली.एकदा अनील अवचटांचं नवं नवंच प्रकाशित झालेली 'दिसले ते' आणि 'जगण्यासाठी काही' ही पुस्तकं मला रद्दीत मिळाली. विचारलं तर रद्दीवाला फक्त पंचवीस रुपयांना द्यायला ती तयार झाला. खुशीनं मी ती घेतली. नंतर पाहिल्यावर कुणालातरी अभिप्रायार्थ म्हणून देण्यात आलेली ती पुस्तकं अगदी घडीही न उलगडता रद्दीत टाकली होती. प्रकाश आमटेंचं प्रकाशवाटाही प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात रद्दीत सापडलं. मी घेतलं ही ते. आणखीही काही अगदी कोरी पुस्तकं मी रद्दीतून विकत घेतली. थोड्नयात त्यांना जीवदान दिलं, पण हे जीवदान देताना मला आनंदापेक्षा खंतच अधिक वाटली.
मान्यवर लेखकांची पुस्तकं अशी रद्दीत पडल्याचं पाहून खूप वाईट वाटलं. वापरुन वापरुन जुनी झालेली ती रद्दी हा अर्थ आता पुस्तकांच्या बाबतीत तरी बदलत चाललाय. हे खरंय. पण नव्या पुस्तकांनाच रद्दीचा रस्ता दाखविला दाखविला गेल्याचं प्रमाणही गेल्या काही वर्षात वाढल्याचं माझ्या शोधक अनुभवानं टिपलं आहे. काहीही असो पण हे रद्दीवाले या वाट चुकलेल्या पुस्तकांना पुन्हा नव्या प्रवाहात आणण्याचं काम करताहेत एवढं मात्र नक्की.

1 comment:

  1. सुरेख आहे लेख अभी . रद्दी मधूनच खूप अनमोल अशी दुर्मिळ पुस्तके सापडतात काही जन्माला पण येतात . वीणा गवाणकरांचा कार्व्हर पण असाच रद्दीतून आपल्यालासापडलेला

    ReplyDelete