Sunday, August 14, 2011

तुम्ही आम्ही "आपण' सगळेच




पाचगणीजवळच्या खिंगर गावात अक्षर मानव संस्थेतर्फे घेण्यात येणारं "आपण संमेलन' नुकतंच पार पडलं. विविध क्षेत्रातली माणसं या संमेलनात सहभागी झाली होती. तुम्ही आम्ही आपण सगळे जण एकत्र येऊ आणि खुल्या वातावरणात विविध विषयांवर चर्चा करू, असंच या स्वरूप होतं. यावेळी चर्चा झाली. या संमेलनाचा "लाइव्ह' रिपोर्ट...



पडद्यावरील मजकूर सरकत जातो



माणसांची गर्दी होण्याची ठिकाणं खूप आहेत. पण जगण्यातले सर्व प्रकारचे भेद बाजूला सारून, माणसांची मनं जुळण्याची आणि निव्वळ माणूस म्हणून एकत्र येण्यासाठी अक्षर मानव नं खिंगर इथं माणसांची संमेलनं घ्यायला सुरवात केली. यात पहिल्या वर्षी "मी संमेलन' दुसऱ्या वर्षी "मी-तू संमेलन' घेण्यात आलं. याचाच पुढचा भाग म्हणून यावर्षी आपण संमेलन.
- अक्षर मानव

पाचगणीचं धुकेशार वातावरण. दवाने भिजलेला खिंगर गावचा दिशादर्शक हिरवट रंगाचा फलक हळू हळू स्पष्ट होत जातो.
त्याखालोखाल "आपण संमेलना'चा फलकही फ्रेममध्ये दिसू लागतो.



कट्‌ टू. : खिंगर (संमेलनाचं ठिकाण)
(एका पत्र्याच्या मोठ्या शेडमध्ये पन्नास साठ खूर्चा मांडलेल्या. या सगळ्या खूर्चांच्या समोर एकच खुर्ची. त्यामागे आपण संमेलनाचा फलक. हळूहळू रिकाम्या खूर्चांवर माणसं बसतात.)

कट्‌ टू.
फ्रेम मध्ये समोरच्या खुर्चीवर बसलेला एक जण दिसत राहतो.
खुर्चीवर बसलेल्या महावीर जोंधळे यांचा चेहरा हळूहळू फोकस होत होत स्पष्ट दिसायला लागतो. आणि सोबत त्यांच्या बोलण्याचा आवाजही.
(माणसाच्या जगण्यात येणारा मी. तिथपासून त्याचा सुरू झालेला प्रवास ते आपण पर्यंत चालू असणारा प्रवास... त्यांचे बोलणे चालूच आहे.)

कट्‌ टू.
(प्रेक्षकांत गोंधळ. कुणाच्यातरी कोणत्यातरी विधानावर बराच खल चाललेला.
कॅमेरा मध्येच प्रेक्षकांमध्ये, खुर्चीकडे सरकत राहतो. प्रेक्षकांना मागे टाकत प्रवीण धोपट यांच्यावर कॅमेरा स्थिरावतो.)
""लेखकानं लेखक असण्याचा ग्रेस बाळगायला हवा. लेखकानं त्याचं त्याचं प्रोफेशन जपलं पाहिजे. रस्त्यावर खड्डे दिसतायत म्हणून त्यानं ते खड्डे बुजवायला जाऊ नये.''
(पुन्हा मघाचचाच खल प्रेक्षकांत. गोंधळ वाढतो. तशी चर्चाही)

कट्‌ टू.
प्रेक्षकांतून उठून राजन खान दिसतात. खलात सहभागी झालेल्यांना शांत करत म्हणतात,
""बऱ्याचदा लेखक हा नुसता लेखक कधीच असत नाही. तो आणि कोणीतरी असतोच. करण मराठीत आणि जगात लेखक म्हणून जगण्याची स्वतंत्र व्यवस्था नाही. पण लिहिता येतं हे एकदा कळाल्यावर आपला लिहितेपणा प्रामाणिकपणाने जपला गेला पाहिजे. अर्थात तो शोध कुणाला लवकर लागेल कुणाला मरेपर्यंत लागणार नाही. पण लेखकाची "लेखकपणाची पोज' ही त्याच्या मेंदूत असली पाहिजे. बाह्य दृष्टीनं पोज कशाला? ''
(असं म्हणून चर्चा संपते. पण लेखकी रसायन म्हणजे नक्की काय? हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहतो.)

कट टू.
(खुर्चीत बसून साप्ताहिक सकाळ कथा स्पर्धेतील विजेता क्षितिज देसाई 18 वर्षाचा कथालेखक बोलतोय. त्याला कथा कशी सुचते. त्याच्या लेखकीपणाच्या जाणिवा काय आहेत याबद्दल काही चर्चा ऐकू येत राहते.)

कट्‌ टू.

धुडगूस चित्रपटाचे कार्यकारी निर्माते पवन वैद्य चित्रपटनिर्मितीबद्दल आणि एकूणच मराठी, हिंदी चित्रपटनिर्मितींबद्दल सांगू पाहतात. मराठी लेखकांची कथा, कादंबरी चित्रपटासाठी निवडल्यावर निर्माता जास्त मानधन देण्यासाठी उत्सुक असतो. पण लेखकाला अपेक्षा विचारल्यावर तो खूपच कमी किंमत सांगतो. अशी काही उदाहरणे त्यांच्या बोलण्यात येतात. आपल्या लेखनाची किंमत आपण ठरवली पाहिजे हा मुद्दा त्यांच्या बोलण्यातून येतो. यावरही चर्चा होते.

कट्‌ टू.
(वातावरण साधारण संध्याकाळचे)
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते किरण मेश्राम शेरोशायरी म्हणत असतात. त्यांचा खरा धंदा ठेकेदारीचा. पण शेरोशायरीचं वेड. एकदा सहज लोकनाथ यशवंत यांच्या कविता हातात पडतात. या कवितांचे ते हिंदीत भाषांतर करतात. या अनुवादित ऐलान या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. चंद्रपूर भागातल्यादगडखाणी त्यामागचं राजकारण. नक्षलवाद यावर त्यांनी गंभीर गप्पा मारल्या.
गप्पा संपवून ते उठतात पण त्यांचा भारदस्त आवाज ऐकू येत राहतो.

(आपण संमेलनाच्या अचानकपणे वक्‍त्याला बोलावण्याच्या "प्रथे'नुसार "ललित'च्या कार्यकारी संपादक शुभांगी पागे यांना व त्यानंतर नृत्यकलाकार राजेश नायर यांना बोलावलं जातं. पागे त्यांचे मॅजेस्टीक मधले अनुभव सांगतात. राजेश नायर आयुष्यात पहिल्यांदाच नृत्यावर बोलतो. त्याच्या नाचानेच संध्याकाळ रंगते.)


कट्‌ टू.

(रात्रीचा माहोल. फ्रेममध्ये शाल अंगाभोवती गुंडाळून बसलेले रवी प्रकाश कुलकर्णी.
कॅमेरा सरकत प्रेक्षकांवर स्थिरावतो. प्रेक्षकही पाचगणीच्या थंडीशी जुळवून घेत कानटोपी, शाल, ब्लॅंकेट अशी सामग्री घेऊन रवी प्रकाश यांचं बोलणं ऐकण्यात गुंतलेले. मनगटी घड्याळात पावणेअकरा वाजलेत. मागून रवी प्रकाश यांचा आवाज येतो एवढे बोलून मी थांबतो'')

प्रेक्षक आपापल्या जागा सोडतात आणि संमेलनाचा पहिला दिवस संपतो.

कट्‌ टू.

(एक भला मोठा हॉल. त्यात बेडच बेड. संमेलनाची झिंग कायम असल्याचं वातावरण. पण तरी हॉल मधल्या एक दोन टोळ्या ट्यूबच्या अपुऱ्या प्रकाशात चर्चा करत बसलेले दिसतात. देव, धर्म हवेत की नको, खरं प्रेम म्हणजे काय? त्यातून होणारी लव्हमॅरेज, बलात्कार अशा विविध विषयांवरची चर्चा चालू आहे. कीऽऽर्र करणाऱ्या रातकिड्यांचा आवाज हळूहळू फेड आउट होत जातो आणि ऐकू येतात माणसांचे आवाज.)
फ्रेममधील एक व्यक्ती बोलते,
"" लव्हमॅरेज झाली तरी जात बदलत नाहीच. नवऱ्याचीच जात पुढे कायम राहिली जाते. कसा सुटणार प्रश्‍न ? ''

( चर्चेतून फ्रेम आउट होत मधूनच येत असलेला घोरण्याचा आवाज हेरून कॅमेरा त्या माणसाला आपल्या फ्रेममध्ये बंद करतो. तेव्हा भिंतीवरच्या घड्याळात रात्रीचे दीड वाजलेले असतात.)

दिवस दुसरा. सकाळचे साधारण अकरा वाजलेले.

सचिन परब तावातावात आपला मराठीपणाचा मुद्दा मांडत असतात. तो मुद्दा अमराठी वाटल्याने समोरची मंडळी मुद्दाखोडून काढताहेत.
फ्रेममध्ये प्रेक्षकांचा चाललेला गोंधळ दिसतो आणि ""कोर्ट शब्द वापरा ना. न्यायालय कशाला. ही आजची भाषा आहे. त्यात इंग्रजी शब्द आले तर काही नुकसान नाही होणार.'' असे शब्द ऐकायला येतात.
कॅमेरा प्रेक्षकांमध्ये सरकतो. "" तुम्ही वर्तमानपत्रात अशी भाषा वापरत असाल, तर चुकीचे बदल तुम्ही लादत आहात...'
मागे कुणीतरी बोलत असतं, कॅमेरा तिकडे झूम होतो. " शहरांत काहीही चालतंय. पण जोपर्यंत आमच्या ग्रामीण भागात मराठी बोलली जातेय तोपर्यंत मराठी टिकेल....''
लॉंग शॉट. समोर प्रेक्षक टाळ्या वाजवतायंत.
कॅमेरा वेगवेगळ्या दिशेने फिरत राहतो. वेगवेगळे आवाजही त्यात मिसळत जातात.
एका चेहऱ्यावर कॅमेरा स्टिल होतो, "" मूळ संकल्पना इंग्रजी असतील, तर त्याला पारिभाषिक शब्द शोधत बसू नये. उदा. मोबाईलला मोबाईलच म्हणावं. कारण ती संकल्पना आपली नाही. पण शून्य आपला आहे; मग त्याचं झिरो होऊ नये, यासाठी प्रयत्न करावा''
असा नवीनच मुद्दा समोर येतो. या मुद्यावर चर्चा संपते. पण इंग्रजी का मराठी हा वाद पत्र्याच्या शेड बाहेरही सुरू राहतो.

कट्‌ टू.

वातावरण ढगाळ
फ्रेममध्ये सोसाट्याच्या वाऱ्यात झाडं हलतायंत. पाऊचही सुरू होतो.
मात्र मागून आवाज येतो ""दारू पिलो त्यामुळं दु:ख जवळून बघता आलं नाही आणि दु:ख कुजून गेलं... '' कॅमेरा महावीर जोंधळे यांच्यावर स्थिरावतो. फ्रेममध्ये महावीर जोंधळे. (बोलण्यात कौतुकाचा स्वर) ""आजवर मराठी साहित्यात "दु:ख कुजलं' अशी उपमा आबा पाटील पहिल्यांदा तुम्ही वापरली...''
टाळ्यांचा आवाज ऐकू येत राहतो.
(आबा पाटील मुळात शेतकरी. स्वत:चं जगणं कवितेत मांडत आलेला. साहित्य विश्‍वात तो नवखाच. पण त्याची कविता फारच गहिरी.. रुजलेली वाटली. काल पासून दिसणारा हा आबा इतकं पक्क रसायन असेल याचा शोध बसलेल्या सर्वांनाच लागलेला असतो.)

अनुभव काय विचारता साहेब,
अनुभव तर सगळ्याच गोष्टींचा आहे मला
दुष्काळात जन्मलो मी...
तेव्हापासून आईबापाच्या जीवावर
जगण्याचा अनुभव आहे मला....

ही कविता ऐकू येत राहते. कॅमेरा प्रेक्षकांमध्ये फिरतो नंतर आबा पाटलांवर स्थिरावतो. त्यांची कविता आणि जगणं यांची सांगड घालणारा आबा पाटलांच्या चेहऱ्याचा "टाइट क्‍लोज अप' फ्रेम मध्ये दिसत राहतो.

पाऊस ओसरलेला.
(कॅमेरा मधे अधे खुर्चीत बसणारे कार्यक्रम आयोजक दगडू लोमटे, लेखिका वासंती देशपांडे यांच्यावर स्थिरावतो. त्यांच्या बोलण्यातले मुद्दे एक एक वाक्‍यात ऐकू येतात.)


कट्‌ टू.
वातावरण संध्याकाळचे
(फ्रेममध्ये पुन्हा टाइट क्‍लोजअप. त्यात खूर्चीतल्या माणसाचे अश्रूंनी भरलेले फक्त डोळे)
कवी संतोष नारायणकर त्याची कवितेची कहाणी सांगत असतो. नापास झालो, शिक्षण सोडलं, आईनं घरातूनही हाकलून दिलं, प्रसंगी रिक्षा चालवली, वणवण भटकलो पण कविता सोडली नाही. कवितेनंच मला जगवलं. असं बरंच बोलून जातो.
आजूबाजूला शांतता. शेवटी संतोष कविता वाचायला लागतो.)

कट्‌ टू.

(रात्री अकरापर्यंत ऋषीकेश जोशी माहोल रंगवतात. दुसरा दिवस संपतो.)

दिवस तिसरा. सकाळ.

(फ्रेममध्ये ज्येष्ठ लेखिका ऊर्मिला पवार बोलताना दिसतात)
बलात्कार म्हणजे काय? बलात्कारी मानसिकतेचं काय करायचं? स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचं काय करायचं? या सगळ्यांतून मार्ग काढून मी कशी जगले. नवऱ्याचा विरोध असूनही मी शिकले; असे बरेच मुद्दे त्यात येतात. ""आयदानमुळे मला प्रसिद्धी मिळाली पण जे घडलं ते लिहिल्यानं अश्‍लील लेखिका अशी थट्टाही समाजातून झाली.''

कट्‌ टू.

फ्रेम लेखिका नीरजा बोलतायंत.
""मला स्त्रीवाद समतेच्या बाजूनं अपेक्षित आहे. आजपर्यंत स्त्रियांच्या बाजूनं लैंगिकतेवर बोललं गेलं नाही. त्यात काही सुख असतं ही बाजूच मांडली गेली नाही. अनेक बायकांना ते माहीतही नसतं. त्यांच्यासाठी तो फक्त एक व्यवहार असतो आणि आम्ही यावर बोललो, लिहिलं तर आम्ही उंडारलेल्या...''

( कॅमेरा गालावर हात ठेवलेल्या एका विचारमग्न पुरुषी चेहऱ्यापाशी येऊन स्थिरावतो. चेहरा आणि मागून येणारा आवाज एकाच वेळी फेड आउट होत होत जातो.)

कट्‌ टू.

शेवटी पुन्हा स्क्रिनवरून भली मोठी मजकुराची पट्टी सरकते. ती अशी.

जगण्यातली एक संकल्पना निवडून त्यावर संमेलनं यापुढेही होत राहणार आहेत. (पुढच्या वर्षी कुटुंब संमेलन). या संमेलनाचा ठरीव असा कार्यक्रम नसतो. खुलेपणा येण्यासाठी कसलाही औपचारिकपणा पाळला जात नाही. लोक एकत्र येतात आणि माणसाच्या जगण्यातला कोणताही विषय थेट बोलायला सुरवात करतात. त्यावर चर्चा करतात. मते मांडतात. यात कुणी कुणाचा फौजदार होत नाही की न्यायाधीश होत नाही. संमेलनाला कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. राहण्याची, खाण्याचीही सोय केली जाते. पण अट मात्र एकच ती म्हणजे तीनही दिवस उपस्थित राहण्याची ! ते का, तर स्वत: तर बोलावच पण इतरांचंही ऐकून घ्यावं आणि माणसं अधिकाधिक संवादी व्हावीत यासाठीच !


(ता.क. - जमतील त्या माणसांमध्ये खुला संवाद संमेलनात होत असल्यानं, काही नावे अपरिचित वाटण्याची शक्‍यता आहे.)