Friday, November 26, 2010

अस्वस्थतेतून सुचते कविता !


कविता कशी सुचते याचं ठोकळेबाज उत्तर माझ्यापाशी नाही। पण जे काही थोडंफार लिहिलं ते अस्वस्थतेतून आलं असं मला वाटतं. जगण्याच्या ओघात कधी कधी उगाचच अस्वस्थ व्हायला होतं. मग ही अस्वस्थता मनाची असते, कधी आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याही गोष्टींची असते. या अस्वस्थतेतूनच एखादा विषय मनाला भिडतो. मग त्या भिडण्यामागूनच शब्दही टपटपत येतात. त्या शब्दांची होते एखादी ओळ. ही ओळच कवितेचा ढाचा घेऊन येते. मग आख्खीच्या आख्खी कविताच डोळ्यासमोर उभी रहाते. त्यातूनच सगळी कविता आकाराला येते. व्यक्त होण्यासाठी इतरही माध्यमं आहेत पण कविता हे त्यातल्यात्यात जवळचं आणि सहज माध्यम वाटलं .
कविता लिहिल्यानंतर तथाकथित विरेचनाची भावना, मोकळं झाल्याचा आनंद होतो, असं मी म्हणणार नाही. मुळात तसं मला वाटतंच नाही. पण कधी स्वत:च्याच ओळी पुन्हा वाचल्यानंतर काही तरी जमल्याची भावना मनाला आनंद देते, खूप समाधान देते. पण या सगळ्यात अस्वस्थता कायमच रहाते. ही अस्वस्थता कधी विसरलेपणाच्याही पलीकडे कुठेतरी लपून बसते. मग कधी स्वत:च्याच अस्वस्थ शब्दांवरुन नजर फिरल्यावर पुन्हा जागी होते. आणि कधी तीच दुसऱ्या कवितेची प्रेरणाही बनते, असं काहीसं माझ्या बाबतीत होत आलंय. अलीकडच्या काळात माणूसपण आपल्या कवितेतून व्यक्त करता यावं असं वाटायला लागलंय. कोणताही आडपडदा, झापडं न लावता, माणसाचं सगुण, निर्गुण, भलं, बुरं रुप स्वीकारत माणूस माणसाशी बोलला पाहिजे, तो निर्मळतेनं व्यक्त झाला पाहिजे, ही भावना मनात कायम रहाते आहे. पण माणसाचं माणूस म्हणून बिघडणं, या गोष्टीनं फार अस्वस्थही व्हायला होत नाहीये. माणसाच्या या बिघडलेपणातून माणूसपणाचं काही अस्सल हाती लागावं याचा शोध सध्या मनातल्या मनातच सुरु आहे. त्यासाठी मात्र गांभीर्यानं पण आपसूकच अस्वस्थ होता आलं पाहिजे.

Tuesday, October 19, 2010

रद्दी !


मान्यवर लेखकांची पुस्तकं अशी रद्दीत पडल्याचं पाहूनखूप वाईट वाटलं. वापरुन वापरुन जुनी झालेली ती रद्दी हा अर्थ आता पुस्तकांच्या बाबतीत तरी बदलत चाललाय. हे खरंय. पण नव्या पुस्तकांनाच रद्दीचा रस्ता दाखविला गेल्याचं प्रमाणही गेल्या काही वर्षात वाढल्याचं माझ्या शोधक अनुभवानं टिपलं आहे. काहीही असो पण हे रद्दीवाले या वाट चुकलेल्या पुस्तकांना पुन्हा नव्या प्रवाहात आणण्याचं काम करताहेत एवढं मात्र नक्की.

कुठल्याशा एका अडगळीत रचून ठेवलेला, थोडीफार जळमटं लागायला सुरुवात झालेला हा प्रत्येकाच्याच घरातला एक ‘विकाऊ’ भाग म्हणजे रद्दी.रोजच्या रोज घरी पेपर येतो. तो नेहमीप्रमाणे शिळाही होतो. एवढं एकच कारण या रद्दी होण्याला. माझ्या घरात मात्र ही रद्दी चार ठिकाणी विखुरली आहे. एक एकदम फ्रेश रद्दी. रोज नव्या जुन्या ‘वर्तमानाचा’ इथं रतीब ठरलेला !
दुसरी यातूनच काही नंतर वाचूयात या बोलीवर वेगळी काढून ठेवलेली रद्दी !
तिसरी म्हणजे कधी तरी सगळाच(अर्थात रद्दीचा) पसारा वेळ मिळाला की घेऊन बसायचा आणि ज्या पानांचा आपला कधी संबंध येत नाही(व्हीवा, सप्तरंग, मुक्तपीठ, गंधर्व, आरोग्य जागर वगैरे...) अशी पानं काढून विकण्यासाठी सज्ज ठेवलेला विकाऊ माल.खरं म्हणजे संग्रहित करुन ठेवलेल्या कात्रणांना रद्दी म्हणण्या इतकंच मोल कधी कधी उरतं. नंतर वाचूया हे स्वत:लाच स्वत: दिलेलं वचन पाळता आलं नाही की, स्वत:वरच रागवल्यासारखं होतं. पण कात्रणांचा ढीग लावण्याचं काही कमी होत नाही, आणि रद्दीचं साचवणं सुरु राहतं. खरं म्हणजे रद्दीचं आणि माझं नात अजोड असल्यासारखं आहे.
एकदा लहान असताना रद्दी विकायला गेलो होतो. तेव्हा त्या दुकानात शंकर पाटलांचं घालमेल पुस्तक रद्दीच्या रगाड्यात दिसलं. तेव्हा शंकर पाटील कोण हे ठाऊक असण्याचा काही संबंधही नव्हता. पण पुस्तक बरं दिसलं म्हणून सहज विचारलं तर तोच रद्दीवाला(पुस्तकवाला) तेच पुस्तक फक्त तीन रुपयाला द्यायला तयार झाला, आणि रद्दीतून पुस्तकं घेण्याचं अक्षरक्ष: वेड लागलं. उगाचच रद्दीच्या दुकानात जाऊन पुस्तकं धुंडाळायची. खिशात पैसे नसले तरी त्याच्या उगाचाच किमती विचारायच्या. असले की, पहिल्यांदा चार दोन रद्दीची दुकानांना भेट द्यायची अशा प्रवासात खूप ‘वैभव’ माझ्या हाती लागलं. यात भल्या भल्या लेखकांची पुस्तकं हाताला लागली. त्यामुळं रद्दीचं दुकान हे माझ्यासाठी पुस्तकांचं दुकान असल्यासारखं झालं.
सुरुवातीला केवळ पुस्तकं आपल्याजवळ असावी या भावनेनं संग्रह करत गेलो. शाळेत असताना अरुणा ढेरेंचं व्याख्यान स्नेहसंमेलनात ऐकलं होतं त्यात त्या म्हणाल्या होत्या की, माझ्या घरात इतकी पुस्तकं आहेत की त्यातून भिंतही दिसत नाही. म्हणजे सगळ्या भिंतीच पुस्तकांच्या असल्यासारख्या.या वाक्याने तेव्हा मनात कुठंतरी घर केलं होतं, उगाचच वाटायचं या रद्दीच्या दुकानांतून पुस्तकं घेऊन आपल्यालाही पुस्तकांच्या भिंती उभ्या करता येतील.असो.नंतर स्वत: कमवायला लागल्यावरही या रद्दीच्या दुकानांचा नाद काही सुटला नाही. केवळ शोधक नजरेनं जवळपास अडिचशे च्या आसपास मला काही चांगली पुस्तकं जमवता आली. यात गीतारहस्यची पहिली प्रिंट, कुमार केतकरांना रिपोर्टींग स्पर्धेत बक्षीस म्हणून मिळालेलं नेहरुचं आत्मचरीत्र(त्यांनी बहुदा ते नंतर रद्दीत टाकलं), साने गुरुजींच कला म्हणजे काय हे दुर्मीळ पुस्तक, आनंदी गोपाळ यांचं चरित्र, अशी एक ना अनेक पुस्तकं मला गवसली.एकदा अनील अवचटांचं नवं नवंच प्रकाशित झालेली 'दिसले ते' आणि 'जगण्यासाठी काही' ही पुस्तकं मला रद्दीत मिळाली. विचारलं तर रद्दीवाला फक्त पंचवीस रुपयांना द्यायला ती तयार झाला. खुशीनं मी ती घेतली. नंतर पाहिल्यावर कुणालातरी अभिप्रायार्थ म्हणून देण्यात आलेली ती पुस्तकं अगदी घडीही न उलगडता रद्दीत टाकली होती. प्रकाश आमटेंचं प्रकाशवाटाही प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात रद्दीत सापडलं. मी घेतलं ही ते. आणखीही काही अगदी कोरी पुस्तकं मी रद्दीतून विकत घेतली. थोड्नयात त्यांना जीवदान दिलं, पण हे जीवदान देताना मला आनंदापेक्षा खंतच अधिक वाटली.
मान्यवर लेखकांची पुस्तकं अशी रद्दीत पडल्याचं पाहून खूप वाईट वाटलं. वापरुन वापरुन जुनी झालेली ती रद्दी हा अर्थ आता पुस्तकांच्या बाबतीत तरी बदलत चाललाय. हे खरंय. पण नव्या पुस्तकांनाच रद्दीचा रस्ता दाखविला दाखविला गेल्याचं प्रमाणही गेल्या काही वर्षात वाढल्याचं माझ्या शोधक अनुभवानं टिपलं आहे. काहीही असो पण हे रद्दीवाले या वाट चुकलेल्या पुस्तकांना पुन्हा नव्या प्रवाहात आणण्याचं काम करताहेत एवढं मात्र नक्की.

Monday, October 18, 2010

रद्दी

Saturday, October 16, 2010

आपसूक व्यक्त होणारं ‘मी तू संमेलन!’


विविध क्षेत्रातल्या लोकांनी एकत्र जमायचं, सलग तीन दिवस, चार रात्री एकत्र रहायचं, एकमेकांशी गप्पा मारायच्या, एकमेकांच्या कलावंत, नट, लेखक म्हणून अगदी रसिक म्हणून अभिव्यक्त होण्याच्या जाणिवा जाणून घ्यायच्या, त्यावर बोलायचं, काही पटलं नाही तर रितसर वादही घालायचे, प्रत्रेकानं स्वत: बोलावं, आजपर्यंत माणूस म्हणून जगण्याचा प्रवास उलगडून दाखवावा, हे सांगता सांगता समोरच्रालाही बोलतं करावं, गप्पा माराव्यात, असा सगळा रा मी तू संमेलनातला
बिनचौकटीचा कार्यक्रम।




संमेलन म्हटलं की, तीन-चार दिवस भरगच्च कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्र, काही मुलाखती, त्यात मान्यवरांचा सहभाग, असा काहीसा साचेबद्ध कार्यक्रम ठरलेला। मात्र, या सगळ्या साचेबद्ध चौकटीत रमता संमेलनाच्या खऱ्या अर्थापर्यंत नेणारंमी तू संमेलननुकतच पाचगणी जवळच्या खिंगर इथं झालं।पाचगणीपासून थोडंसं आतटेबल लॅण्डच्याएका कपारीत वसलेलं खिंगर हे गाव। जिथं सहसा मिळणाऱ्या सोयी-सुविधा सहज उपलब्ध होणार नाहीत. मुळात कल्पनाही तशी की, विविध क्षेत्रातल्या लोकांनी एकत्र जमायचं, सलग तीन दिवस, चार रात्री एकत्र रहायचं, एकमेकांशी गप्पा मारायच्या, एकमेकांच्या कलावंत, नट, लेखक म्हणून अगदी रसिक म्हणून अभिव्य्नत होण्याच्या जाणिवा जाणून घ्यायच्या, त्यावर बोलायचं, काही पटलं नाही तर रितसर वादही घालायचे, असा सगळा अनौपचारिक कार्यक्रम।
अक्षर मानवचे मागच्या वर्षीमी संमेलनहोतं. स्वत:ला केंद्रित ठेवून होणाऱ्या गप्पा असा काहीसा त्याचा विषय. त्यातही अनेक दिग्गज सहभागी झाले होते. यंदाच्यामी तू संमेलनामध्ये वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे, लेखिका मेघना पेठे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार, कवी-नट किशोर कदम, लेखक-दिग्दर्शक अमित राय, चित्रकार श्रीधर अंभोरे, कवी लोकनाथ यशवंत, समीक्षक अविनाश सप्रे, लेखक सतीश तांबे, ‘जोगवाची पटकथा लिहिणारे आणि राज्य शासनाच्या पुरातत्त्व खात्याचे संचालक संजय पाटील, गझलकार दिलीप पांढरपट्टे यांच्यासहित विविध क्षेत्रातले मान्यवर या संमेलनात सहभागी झाले होते. संमेलनाची सुरुवात सकाळी दहा वाजता व्हायची. मात्र, यावेळी कोण बोलणार? कशावर बोलणार? हेही ठरलेलं नाही. ऐनवेळी संयोजक येणार याबड्यामंडळींपैकी कोणाही दोघांना बोलावणार आणि सुरू व्हायचा रंगतदार गप्पांचा कार्यक्रम. त्यात त्यांनी स्वत: बोलावं, आजपर्यंत माणूस म्हणून जगण्याचा प्रवास उलगडून दाखवावा, हे सांगता सांगता रसिकांनाही बोलतं करावं, गप्पा माराव्यात, असा सगळा बिनचौकटीचा कार्यक्रम.अशा प्रकारच्या गप्पांमधून अनेक विषय पुढे आले.
मेघना पेठे आणि सतीश तांबे यांच्या चर्चेतून एक विषय आला की, ग्रामीण भाषेत जे लिखाण येतंय, त्यात असे काही शब्द येतात की जे शहरी वाचकांना समजत नाहीत. मग ते समजण्यासाठी काहीतरी व्हायला हवं. या दोघांच्याही साहित्यात आलेल्या लैंगिकतेचं वर्णन किंवा अशा प्रकारच्या लिखाणातून एक लेखक म्हणून घरचं काही दडपण जाणवतं का? मग त्याला एक लेखक म्हणून कसे सामोरे जाता? याबाबत सतीश तांबे यांनी सांगितलं की, कोणतंही दडपण लिहिताना नसतं; पण वाचकांचं काहीसं दडपण एक लेखक म्हणून मनावर असतं यासाठी कोणती शैली वापरावी, भाषा कशी असावी असे प्रयोगही त्यातनं होतात; पण लेखक म्हणून जे म्हणायचं असतं ते ठामपणे लिखाणातून मांडतो.माझी अस्मिता मुंबईत लेखक म्हणून नाही. मी जिथे राहते, तिथला वाण्यावाला, दूधवाला त्यांना माहितीही नसतं की मी काही लिहिते. लेखक म्हणून मी एकटी असते. त्यामुळं तसं दडपण कधीच वाटलं नाही, असं मेघना पेठे यांचं म्हणणं होतं.नाटककार म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेल्या दिलीप जगताप यांचे 1980 सालीएक अंड फुटलंहे पहिलं नाटक आलं. तेव्हापासून ते आजपर्यंत (2010 जा खेळायला जा) त्यांनी 22 नाटकं लिहिली. त्यांच्या बोलण्यातून प्रगल्भ नाटकाबाबत विविध पैलू समोर आले. तुषार भद्रेही त्याच भागातले एक प्रसिद्ध नाटककार. 1976 पासून नाटकासाठी अक्षरश: सर्वस्वी अर्पण केलेले. कलाकारानं माणसं घडवली पाहिजेत, या विजय तेंडूलकरांच्या सूचनेवरून त्यांनी आजपर्यंत जवळपास 10 हजार रंगकर्मींना प्रशिक्षण दिलं आहे.
सरकारी जबाबदाऱ्या सांभाळून साहित्यात तर साहित्य सांभाळून सरकारी जबाबदारी समर्थपणे पार पाडणारे गझलकार दिलीप पांढरपट्टे आणिजोगवाचित्रपटाची पटकथा लिहिणारे संजय पाटील (पुरातत्त्व खात्याचे संचालक) यांनीही आपल्या जगण्याच्या जाणीवा मोकळेपणाने व्य्नत केल्या. दिलीप पांढरपट्टेंनी अगदी सुरुवातीच्या काळात लिहिलेली गझल कवी सुरेश भट यांना पाठवली तेव्हा त्यांचं पत्र आलं की, जी पाठवली ती गझल नाही. त्यात काही तंत्राच्या चुका आहेत, पण तू चांगला कवी आहेस, मार्गदर्शन आणि प्रयत्न केल्यास चांगल्या गझल लिहिशील. मला खात्री आहे की, तू मला पुण्यात येऊन भेटशील. असं पत्र पाठवून खाली लिहिलं तुझा चाहता सुरेश भट.यामुळं खूपच बळ मिळाल्याचं पांढरपट्टे यांनी नोंदवलं. त्यानंतर जाणीवपूर्वक ऊर्दू शिकलो. यशवंत देव यांच्या सांगण्यावरून कोळी गीतं लिहिली. अशोक पत्की यांच्या सांगण्यावरून लावण्या लिहिल्या. दिलीप पांढरपट्टे हे सध्या सिंधुदुर्गमध्ये प्रशासकीर सेवेत आहेत. हा प्रशासकीय भार सांभाळूनही ते आपली साहित्यनिर्मिती करत आहेत. आनंदी जगण्याची वृत्ती असल्याने स्वत:शीच नेहमी प्रयोग करत राहिलो. या प्रयोगातूनच नवं नवं शिकत गेलो. असं त्यांनी सांगितलं.पुरातत्त्व खात्याचे उपसंचालक या महत्त्वाच्या पदाचा ताण सांभाळून आवड म्हणून चित्रपट क्षेत्रात काम करणारे संजय पाटील यांनीजोगवाया चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. हे सर्वांना माहीत आहेच. सध्या तेपांगिराया चित्रपटावर काम करीत आहेत. सध्या ते एक कादंबरी लिहितायेत. माणसाचं बदललेलं जगणं, त्याचा प्राण्यांवर, निसर्गावर झालेला परिणाम असा काहीसा वरवर सोपा वाटणारा; पण अतिशय गुंतागुंतीचा विषय संशोधन करून ते आपल्या लिखाणातून मांडणार आहेत. यावर आजपर्यंत केलेल्या संशोधनाबद्दल त्यांनी सांगितलं. ‘सामनाचित्रपटाची निर्मिती करणारे रामदास फुटाणे हे आपल्या जीवनातल्यारखडलेल्या काळाबद्दलभरभरून बोलले. ‘सामनाकाढला त्यावेळी तो चालला नाही दोन वर्षांनी त्याला प्रतिसाद मिळाला. दरम्यानच्या काळात खिशात पैसे नसणं, कुठं जायला यायला पैसे नसल्याकारणानं भाषणाची निमंत्रणं नाकारणं, त्याआधी ग्रामीण राजकारणावरचा सिमेमासामनाया चित्रपटाचं लिखाण करण्यासाठी विजय तेंडूलकरांना तयार करणं. चित्रपटाचं नाव आधीसावलीला भिऊ नकोअसं ठेवण्यात आलं होतं, नंतर ते बदलूनसामनाअसं केलं. हेही त्यांच्या बोलण्याच्या ओघात समजलं. अभिनेता गिरीष साळवी आणि मिलिंद शिंदे यांनीही आपल्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल सांगितलं. सुरुवातीला लागलेली हेल्परची नोकरी त्यानंतर नाटकाच्या वेडानं आजपर्यंत झालेला प्रवास. त्यातून पैसे फारसे मिळाले नसल्याचं कबूल करताना आजवर मला माझ्या बायकोनं पोसला हेही साळवी यांनी अभिमानानं सांगितलं. नटांना जसा चेहरा असतो तसा मला नाही. मुळातच मला जी माणसं भेटली त्यांच्यामुळे मी नट झालो. असं मिलिंद शिंदे यांनी नमूद केलं. नट म्हणून ओळख असणारे मिलिंद शिंदे पुस्तकरूपातही आपल्याला भेटणार आहेत. लवकरच त्यांचा एक लेखसंग्रह प्रकाशित होणार आहे.
स्त्रीला स्त्री म्हणून अनेकवेगळ्याअनुभवांना सामोरं जावं लागतं, त्यावर भाष्य केलं प्रकाशक मीना कर्णिक आणि सुमती लांडे यांनी. बोलण्यासारखं काहीच नाही असं म्हणत सुरुवात झालेल्या दोघींनीही भरभरून सांगितलं. कादंबरीकार रंगनाथ पठारे आणि समीक्षक अविनाश सप्रे यांनी साहित्य क्षेत्रात असलेल्या लेखक, प्रकाशक, वाचक, समीक्षक या घटकांबद्दल सांगितलं. साहित्य प्रक्रियेत वाचकाचं स्थान महत्त्वाचं आहे. लेखकापुढे वाचकाचा दरारा निर्माण होईल, अशी स्थिती अजून नाही त्यासाठी वाचक प्रगल्भ व्हायला हवा, असा सूर या दोघांच्या बोलण्यातून निघाला.संमेलनात सर्वांत लक्षात राहिला तोजोगवाया चित्रपटात काम केलेल्या कवी किशोर कदम यांनी सांगितलेला एक विलक्षण अनुभव. चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याअगोदर त्यांनी जेव्हा पुरुषांचा पेहराव उतरवून स्त्रीचा साडी-ब्लाऊज असा पोषाख घातला. तेव्हा आपण पुरुष नाही, आपल्यातलं पुरुषत्व संपलं अशी भावना त्यांच्या मनात आली. हा रोल सोडावा असंही वाटलं; पण दुबेजींच्या तालमीत तयार झालेल्या किशोरला समजलं की, या अभिनयासाठी नेमकं हेच फिलींग पकडायला हवं. तेच पकडून संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. तसंच कलावंत म्हणून दरवेळी नैराश्याच्या गर्तेत अडकणं होतं, त्यावेळी खूपलोनलीवाटतं. अशा वेळी नैराश्याच्या गर्तेत स्वत:चाच हात घेऊन जगत आल्यानं यालोनलीपणातून बाहेर येणं होतं. प्रत्येकालाच असं वाटतं, त्यातून बाहेर येण्यासाठी प्रत्येकाने स्वत:चे मार्ग शोधले पाहिजेत, या किशोर कदमच्या बोलण्यात सर्वच जण रमून गेले होते.तीन दिवस (1,2 आणि 3 ऑ्नटो) रंगलेल्या या संमेलनाचा ढाचा वेगळा असल्यानं प्रत्येकालाच ते भावलं. यात प्रत्येकाचाच प्रत्येकाशी संवाद झाला. आलेली सर्व मंडळी ही राहती असल्यानं वाट्टेल तेव्हा हवं त्याला गाठावं, त्यानं लिहिलेल्या, केलेल्या भूमिकेबद्दल वाटलं ते सांगावं, गप्पा माराव्यात, असं काहीसं मोकळं आणि संमेलनाच्या रुळलेल्या चौकटी मोडून जमण्याचा हा प्रयोग असल्यानं सर्वांनाच एकमेकांच्या जगण्याचे कंगोरे कळण्यास मदत होते.
प्रत्येकाची जगण्याची म्हणून काही विधानं असतात. ती विधानं एकमेकांना कळावी. कळालेली विधानं एकमेकांपर्यंत पोहोचवावीत. मानवी जगणं संवादी पातळीवर व्य्नत होत राहण्यासाठी एकत्र येणं हे महत्त्वाचं आहे. यासाठी संमेलन ही अगदी योग्य जागा आहे. मात्र, मोठ्या गर्दीत संमेलनाचा हा हेतू साध्य होताना दिसत नाही. अगदी स्वत:लाच संमेलनजगल्याचाआनंद ही मिळत नाही. त्यादृष्टीनं या संमेलनात अगदी आपसूकपणे एकमेकांशी खऱ्या अर्थानं संवाद साधता आला.

राजन खान

संमेलनातून एकमेकांचे सम्मीलन झाले हा केवळ औपचारिक उरकाउरकीचा कार्यक्रम राहिला नाही। माणसं एकत्र आली पाहिजेत, एकमेकांमध्ये मिसळली पाहिजेत, आणि केवळ तीन दिवसांसाठी नाही तर आयुष्यभरासाठीचं माणूस म्हणून जुळणं व्हावं हा हेतू यामागे होता. केवळ साहित्य क्षेत्रासाठीच नव्हे तर जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात अशा प्रकारे मानवी नात्यांची जुळवणूक झाली पाहिजे.

मेघना पेठे
अशा छोट्या प्रकारच्या संमेलनात व्यक्ती व्यक्तींचा थेट संपर्क होऊ शकतो, त्यामुळं एक कलावंत म्हणून एकमेकांचे जगण्याचे संघर्ष, त्याचे बारीक तपशील जाणून घेणं सहज शक्य जाले

रंगनाथ पठारे
कलावंताला स्वत:च्या संदर्भात आणि भोवतालसंदर्भात काही प्रश्न पडलेले असतात, या प्रश्नांची उत्तरं या संमेलनामुळं मिळाली। कलावंतांचे दृष्टिकोन कळाले, ‘शेअरिंग’ झालं, तसंच कलावंताला कलाकृतीबाबत ‘फिडबॅक’ हवा असतो तो इथं मिळाला

मिलिंद शिंदे
विपश्यनेत आपण मौन धारण करतो ते अव्यक्त असतं, त्याचप्रमाणे स्वत:कडेच एका वेगळ्या पातळीवरुन बघण्याचा हा व्यक्त असा फॉर्म वाटला। यामुळं स्वत:चेच वेगवेगळे पडदे उघडले गेले। तसेच इतरांमध्येही आपला शोध घेण्याची प्रक्रिया सहजपणाने झाली।

रामदास फुटाणे
संमेलनात विविध क्षेत्रातले कलावंत असल्याने त्यांचा संघर्ष समजावून घेता आला। प्रत्येकाची एक कलावंत म्हणून जी काही जडण घडण झाली आहे, जो काही संघर्ष झालेला आहे तो यानिमित्तानं कळाला. त्यामुळं कलावंताच्या जाणिवाही प्रगल्भ झाल्या. गर्दीच्या संमेलनात हे सहसा शक्य होत नाही

प्रतिभा ' नपुंसक ' झाल्याचा फील !


शीट! बऱ्याच दिवसांत एकही कविता सुचली नाही! संपली आपली प्रतिभा! काय हे! चार ओळी वर्षानुवर्षे सुचत नाहीत म्हणजे काय.. उगाचच कुठली तरी कविता वाचताना आपली बऱ्याच दिवसांपासून पाटी कोरी राहिली असं जाणवलं.. आता असं जाणवल्यावर लगेच सुचायला आपण काय गुरू ठाकूर, संदीप खरे, प्रवीण दवणे थोडेच लागून गेलो. ते इतके भारी आहेत की अशा जाणवण्यावरच एखादी कविता करतील. माझ्यासारख्या कविंना कविता सुचायला हवा असतो एखादा 'टची' विषय.. मनाला भिडणारा.. तळमळवणारा.. संदीप खरे म्हणतो,
'कविचं आयुष्य सोपं असतं यासाठी की,
एक जरी अस्सल कविता लिहिली,
तरी मरायची मुभा असते त्याला..
मात्र, कविचं आयुष्य अवघड असतं यासाठी
की अस काही लिहिल्याची मरेपर्यंत खात्री नसते त्याला॥'
कधी इतकं सहज न येता नुसतेच शब्द टपटपत येतात. ते उतरवत उतरवत कविता आकाराला येते आणि असं बऱ्याच दिवसांतून घडलं नाही की प्रतिभा नपुंसक झाल्याचा फील येतो, जसा की आता आलाय...

Friday, October 15, 2010

रात्रीच्या रस्त्याचं अतूट नातं!




रात्री उशिरा घरी येणं होतं. येताना सगळे रस्ते सामसूम; अंधारानं माखलेले... दिवे उदासपणानं आपल्या नेहमीच्याच ‘स्टाईलनं’ रस्त्यावर प्रकाश पाडण्याचं काम करतायत, एकदा सूर्य अस्ताला जाताना त्याला प्रश्न पडला, की, आता या जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करणार? तेव्हा म्हणे एक मिणमिणती चिमणी पुढं आली आणि म्हणाली की, ‘‘सगळ्या जगाचं मला माहीत नाही; मात्र, मी माझ्या परीनं जगाला प्रकाश देण्याचं काम करीन...’’ हा असला ‘चिमणीचा’ भाव या रस्त्यावरच्या दिव्यात मला तरी दिसत नाही. सगळे निर्जीव साले...!लकडी पूल, गरवारे ब्रीज, एफ.सी रोड आणि नंतर शेतकी महाविद्यालय असा माझा रोजचा रात्रीचा प्रवास...प्रवास रोजचा एकच मात्र रोजची रात्र वेगळी, वेगळा अनुभव देणारी... आणि त्यातही प्रत्येक रात्रीची स्वत:ची अशी एक लकब आहे. ती लकब जपतच ती रात्र उजाडते आणि मावळते. उदा. लकडी पूल संपला की तुम्हाला हमखास दिसणार दोन खुर्च्या...पोलिसांनी ‘जड’ झालेल्या... पुढे आलात की, दिवसा कधीही न पाहायला मिळणारं ‘न गजबजणारं’ डेक्कन. आणखी थोडं पुढं या.. रानडेच्या कॉर्नरवर, की एका बाईची भुर्जीची गाडी (आज भुर्जीची गाडी नव्हती. रोज असते. गाडी आणि ती बाई आज कुठे गेली? ) आणखी थोडं आलात की सीसीडी, रिलायन्स वेबवर्ल्ड, इत्नया रात्रीही जाहिरात करत लाईट जाळत असतात.. पुढं ज्ञानेश्वर पादुका चौकात, फालुदाची गाडी दिसणार. साडेबारापर्यंतच तिचं अस्तित्व.. आणि शेवटचं म्हणजे म्हसोबागेटच्या समोर स्टेट बँकेच्या कॉर्नरला, नेमक सांगायचं तर ‘ग्रेट’ वसंतराव नाईकांच्या पुतळ्यापासून जाताना कुत्री अंगावर भुंकली नाहीत तर ती रात्र, रात्र वाटत नाही... अशा काही रात्रीच्या पाऊलखुणा रस्त्याला भर रात्रीही ‘जागवत’ असतात. यातलं एखादं दृश्य दिसलं नाही की काहीतरी खटल्यासारखं वाटतं... अरे आज सीसीडीची लाईट बंद होती.. फर्ग्युसनचं गेट इत्नया रात्रीही उघडं कसं.. पोलिसांचा राऊंड आज भेटला नाही वाटेत.. ललित महालच्या हॉटेलचा पॅसेज आज रोजच्या सारखा झाकला नाही ताडपत्रीनं.. शेतकी महाविद्यालयाच्या गेटवरचा वॉचमन आज जागा कसा? काही भानगड? अशी एक ना अनेक निरीक्षणं नोंदवत रात्रीचा प्रवास हा वेगळा भेटतो.घरी आलोय... तरी रस्त्यांवरच्या गाड्यांचे आवाज ‘लख्ख’ ऐकू येतायेत.. कसं बरं? रोज पलीकडून ‘अरे, मला जरा मदत कर रे’ असा आईचा आवाज ऐकू येत नाही. यावरून या रात्रीची, शांततेची पोहोच फार दूरपर्यंत असल्याचं लक्षात येतं.घड्याळाचे काटे, रातकिड्यांचे आवाज, वातावरणात वेगळाच नाद निर्माण करतायेत.. हातात पेन, समोर माझ्या पुस्तकांचं कपाट.. कोणतं बरं घ्यावं वाचायला ? लवकर ठरत नाही.. दरवाजा उघडतो.. रात्रीला न्याहाळतो.. अरे मघाचाच गाड्यांचा आवाज आता ऐकू कसा येत नाही.. रस्ता थांबला की गाड्या? रस्त्याच्या बाजूला कान लावूनही काही ऐकू येत नाही.. पाच मिनिटं.. सहा.. अरेच्चा! वैतागून पुन्हा आहे त्या ‘ऐकू येणाऱ्या’ जागेवर बसतो आणि जरा वेळानं तोच पीऽपीऽऽऽप... घूंऊंऽऽऊं असा आवाज पुन्हा सुरू होतो.. आणि माझं अन् रस्त्याचं (रात्रीचं) तुटलेलं नातं पुन्हा जोडतो..