Friday, October 15, 2010

रात्रीच्या रस्त्याचं अतूट नातं!




रात्री उशिरा घरी येणं होतं. येताना सगळे रस्ते सामसूम; अंधारानं माखलेले... दिवे उदासपणानं आपल्या नेहमीच्याच ‘स्टाईलनं’ रस्त्यावर प्रकाश पाडण्याचं काम करतायत, एकदा सूर्य अस्ताला जाताना त्याला प्रश्न पडला, की, आता या जगाला प्रकाश देण्याचं काम कोण करणार? तेव्हा म्हणे एक मिणमिणती चिमणी पुढं आली आणि म्हणाली की, ‘‘सगळ्या जगाचं मला माहीत नाही; मात्र, मी माझ्या परीनं जगाला प्रकाश देण्याचं काम करीन...’’ हा असला ‘चिमणीचा’ भाव या रस्त्यावरच्या दिव्यात मला तरी दिसत नाही. सगळे निर्जीव साले...!लकडी पूल, गरवारे ब्रीज, एफ.सी रोड आणि नंतर शेतकी महाविद्यालय असा माझा रोजचा रात्रीचा प्रवास...प्रवास रोजचा एकच मात्र रोजची रात्र वेगळी, वेगळा अनुभव देणारी... आणि त्यातही प्रत्येक रात्रीची स्वत:ची अशी एक लकब आहे. ती लकब जपतच ती रात्र उजाडते आणि मावळते. उदा. लकडी पूल संपला की तुम्हाला हमखास दिसणार दोन खुर्च्या...पोलिसांनी ‘जड’ झालेल्या... पुढे आलात की, दिवसा कधीही न पाहायला मिळणारं ‘न गजबजणारं’ डेक्कन. आणखी थोडं पुढं या.. रानडेच्या कॉर्नरवर, की एका बाईची भुर्जीची गाडी (आज भुर्जीची गाडी नव्हती. रोज असते. गाडी आणि ती बाई आज कुठे गेली? ) आणखी थोडं आलात की सीसीडी, रिलायन्स वेबवर्ल्ड, इत्नया रात्रीही जाहिरात करत लाईट जाळत असतात.. पुढं ज्ञानेश्वर पादुका चौकात, फालुदाची गाडी दिसणार. साडेबारापर्यंतच तिचं अस्तित्व.. आणि शेवटचं म्हणजे म्हसोबागेटच्या समोर स्टेट बँकेच्या कॉर्नरला, नेमक सांगायचं तर ‘ग्रेट’ वसंतराव नाईकांच्या पुतळ्यापासून जाताना कुत्री अंगावर भुंकली नाहीत तर ती रात्र, रात्र वाटत नाही... अशा काही रात्रीच्या पाऊलखुणा रस्त्याला भर रात्रीही ‘जागवत’ असतात. यातलं एखादं दृश्य दिसलं नाही की काहीतरी खटल्यासारखं वाटतं... अरे आज सीसीडीची लाईट बंद होती.. फर्ग्युसनचं गेट इत्नया रात्रीही उघडं कसं.. पोलिसांचा राऊंड आज भेटला नाही वाटेत.. ललित महालच्या हॉटेलचा पॅसेज आज रोजच्या सारखा झाकला नाही ताडपत्रीनं.. शेतकी महाविद्यालयाच्या गेटवरचा वॉचमन आज जागा कसा? काही भानगड? अशी एक ना अनेक निरीक्षणं नोंदवत रात्रीचा प्रवास हा वेगळा भेटतो.घरी आलोय... तरी रस्त्यांवरच्या गाड्यांचे आवाज ‘लख्ख’ ऐकू येतायेत.. कसं बरं? रोज पलीकडून ‘अरे, मला जरा मदत कर रे’ असा आईचा आवाज ऐकू येत नाही. यावरून या रात्रीची, शांततेची पोहोच फार दूरपर्यंत असल्याचं लक्षात येतं.घड्याळाचे काटे, रातकिड्यांचे आवाज, वातावरणात वेगळाच नाद निर्माण करतायेत.. हातात पेन, समोर माझ्या पुस्तकांचं कपाट.. कोणतं बरं घ्यावं वाचायला ? लवकर ठरत नाही.. दरवाजा उघडतो.. रात्रीला न्याहाळतो.. अरे मघाचाच गाड्यांचा आवाज आता ऐकू कसा येत नाही.. रस्ता थांबला की गाड्या? रस्त्याच्या बाजूला कान लावूनही काही ऐकू येत नाही.. पाच मिनिटं.. सहा.. अरेच्चा! वैतागून पुन्हा आहे त्या ‘ऐकू येणाऱ्या’ जागेवर बसतो आणि जरा वेळानं तोच पीऽपीऽऽऽप... घूंऊंऽऽऊं असा आवाज पुन्हा सुरू होतो.. आणि माझं अन् रस्त्याचं (रात्रीचं) तुटलेलं नातं पुन्हा जोडतो..

1 comment:

  1. likhan chan aahe, ABHIJEET NE LIHILELE ANUBHAV MI PAN ROJ GHETO PAN TEE DRUSHTI NAVATI. NIRIKSHANA MASAT VATALI AANI HO MANDNYACHEE SADHI SOPI PADDHAT MANALA BHIDLI

    ReplyDelete